मृत्युपत्रं ७: हुकूमावरून…


Creative Writings, मृत्युपत्रं / Saturday, January 7th, 2017

नयनाला जी झोप लागली, ती परत उठलीच नाही. तिच्या इच्छेनुसार तिच्या मैत्रिणीने तिचं शेवटच मृत्युपत्र सगळ्यांसमोर वाचून दाखवलं.

  • तुम्ही हे पत्र वाचत आहात म्हणजे दोनच शक्यता आहेत: एकतर मी मेले आहे किंवा मी व्हेंटीलेटर वर आहे. मी व्हेंटीलेटरवर असल्यास माझ्या परत येण्याची वात पाहू नये. सहा तासाच्या आत व्हेंटीलेटर काढून घ्यावा.
  • मी माझे अवयव (हृदय, किडनी, डोळे, त्वचा, केस इ.) आणि देहदान करायचे ठरवले आहे. माझे अवयव कुणाला द्यावेत ह्यात माझ्या पालकांचे मत घेऊ नये, तो निर्णय सर्वस्वी डॉक्टरांचा असेल. माझा देह मेडिकल कॉलेजमध्ये देण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यातून काहीतरी शिकता येईल.
  • माझ्यासाठी कुठलीही शोकसभा, स्मरणसभा, माझ्या आठवणीत माझ्या फोटोसचं एक्झीबिशन, दहावं, तेरावं, श्राद्ध, गावजेवण असे प्रकार करू नयेत. अगदीच काही करायची हौस असेल तर माझ्या मित्रांना दारू पार्टी द्यावी.
  • माझे कपडे, accessories आणि मेक-अपचं सामान ह्यातलं माझ्या मैत्रीणीना काही हवं असेल तर द्यावं. नाहीतर डोनेट करावं. घरात त्याचा पसारा मांडून ठेवायची गरज नाही. पुस्तके शहरातील नगर वाचनालयास डोनेट करावीत.
  • माझ्या flat वरील फर्निचर, भांडी, इलेक्ट्रोनिक्स हे सर्व माझ्या एकट्या flatsवर राहणाऱ्या मित्रपरिवारास त्यांच्या गरजेनुसार वाटून टाकावीत.
  • माझ्या बॅंक अकाऊंट मधले सर्व पैसे आणि insurance मधून येणाऱ्या रकमेतील अर्धे पैसे अग्निशमन दलास द्यावे.
  • माझा DSLR, त्याच्या लेन्स आणि त्याची supplementary equipments माझ्या आईला देण्यात यावीत. माझ्यातली कला तिच्याकडून आली आहे आणि त्यामुळे माझा फोटोग्राफीचा वारसा ती चालवेल.
  • हे वाचताना, वाचून झाल्यावर कुणीही रडायचं नाहीये नाहीतर मी परत येऊन त्या व्यक्तीला माझ्या खोड्यांनी हैराण करेन.

हुकूमावरून,

नयना.

समाप्त.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *