सौदी अरेबिया आणि वाहन चालवण्याचे स्वातंत्र्य!


Creative Writings / Monday, July 2nd, 2018

सौदी अरेबिया हा मध्यपूर्व आशिया खंडातील सर्वांत मोठा अरब देश आहे. सौदी अरेबिया तेथील तेलाच्या खाणी, मक्का-मदिना ही शहरे आणि चविष्ट खजुरांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. स्वप्नवत वाटतील अशा उंच राजेशाही इमारती आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या ह्या देशात महिलांची अवस्था मात्र दयनीय आहे असेच म्हणावे लागेल. २०व्या शतकानंतर जगभर महिलांच्या हक्कांसाठी चळवळी लढल्या गेल्या आणि महिलांनी त्यांच्या प्रांतात समानतेचे कायदेशीर हक्क मिळवण्यात यश प्राप्त केले. पण सौदी अरेबियामध्ये मात्र महिलांचे हक्क त्यांच्या शेजारील देशांच्या स्त्रियांच्या तुलनेत बर्यापैकी मर्यादित होते. एकविसावे शतक सुरु झाल्यानंतर देखील ह्या परिस्थितीत विशेष सुधारणा झाल्या नाहीत. २०१६ साली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केलेल्या ग्लोबल जेन्डर गॅप रिपोर्टनुसार लिंग गुण समानतेच्या बाबतीत सौदी अरेबियाचा क्रमांक १४४ पैकी १४१वा होता.

आपल्या देशात आपल्याला समान हक्क मिळावेत म्हणून सौदी अरेबियामधील महिलांनी विविध चळवळी सुरु केल्या. त्यातील एक सर्वांत महत्त्वाची आणि खर्या अर्थाने यशस्वी ठरलेली चळवळ म्हणजे ‘वुमन टू ड्राईव्ह मुव्हमेंट’ होय. सौदी अरेबियामध्ये लिखित स्वरूपात महिलांना गाडी चालवण्यापासून बंदी नव्हती पण सौदी कायद्यानुसार वाहन चालकास स्थानिक स्वरूपात मंजूर केलेला वाहन चालक परवाना असणे आवश्यक होते. हा परवाना महिलांना देण्यात येत नसे जेणेकरून त्यांनी रत्यावर वाहन चालवणे हे आपोआपच बेकायदेशीर मानले जाई. सौदीमध्ये महिलांनी गाडी चालवण्यास विरोध करण्याऱ्या लोकांमध्ये सर्वांत मोठा गट हा कट्टर धार्मिक लोकांचा होता. त्यांच्या मतानुसार महिलांनी चारचाकी वाहन चालवणे हे हराम आहे आणि ते चालवून महिला आपल्या समाज आणि कुटुंबाचे स्वास्थ्य धोक्यात आणतील.

आपल्या शेजारील देशांमध्ये महिलांना गाडी चालवण्याचे स्वातंत्र्य आहे तर आपल्याला का नाही? चारचाकी वाहन चालवण्यात स्त्री आणि पुरुष हा भेदभाव का करावा, असे प्रश्न विचारात वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सौदी अरेबियामधील महिलांनी त्यांच्या गाडी चालवण्यावर असलेल्या बंदी विरुद्ध बंड पुकारले.

ह्या चळवळीची पहिली ठिणगी पडली ६ नोव्हेंबर १९९० रोजी जेव्हा तब्बल ४७ स्त्रियांनी रियाधमध्ये चारचाकी गाडी चालवली. पण हे बंड पुकारल्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना एक रात्र जेलमध्ये काढून भोगावी लागली. अनेकींना तर त्यांच्या नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले. २००८ सालच्या महिला दिनी सौदी अरेबियामधीलमहिला चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या वजेहा-अल-हुवैदर ह्यांनी यु-ट्यूब वर आपला चारचाकी चालवतानाचा एक व्हिडियो टाकून खळबळ माजवली. त्यानंतर अनेक याचिका आणि अर्ज सौदीच्या राजांना पाठवण्यात आले. हळूहळू ही चळवळ बाळसे धरू लागली.

महिलांना चारचाकी चालवायचा अधिकार मिळवण्याच्या ह्या चळवळीचा परमोच्च बिंदू म्हणजे मनल-अल-शरीफ हिने काही महिलांसोबत फेसबुकवर २०११ साली ‘वुमन टू ड्राईव्ह’ ही मोहीम सुरु केली तो होय. ह्या मोहिमेचे पडसाद देशभर पडू लागले आणि अनेक महिलांनी चारचाकी चालवण्यास सुरुवात केली. लवकरच मनल-अल-शरीफला अटक करण्यात आली. शेवटी दोन अटींवर तिची जामीनावर सुटका करण्यात आली: ती परत कधीही कार चालवणार नाही आणि ती ह्या घडलेल्या घटनेबद्दल कुठल्याही माध्यमाशी बोलणार नाही. मनल-अल-शरीफच्या अटक आणि जामिनाच्या ह्या काळात देशभरातील स्त्रिया रस्त्यावर उतरल्या, पण आपल्या चारचाकीमध्ये चालकाच्या जागी बसून. त्यांनी आपले चारचाकी चालवतानाचे व्हिडियो शेअर केले, अनेकींना अटक झाली, काहींना लगेच तर काहींना उशिराने जामीन मिळाले. सौदी सरकारने ही मोहीम मोडून टाकण्याचा जितका जास्त प्रयत्न केला, ती तितकीच सशक्त होत गेली. ह्या काळात ह्याच मोहिमेशी निगडीत विविध विषयांवर चर्चा आणि अधिक छोट्या-मोठ्या मोहिमा सुरु झाल्या.

अखेरीस ह्या सर्व मोहिमांची, अटक सत्रांची आणि याचिकांची सांगता २६ सप्टेंबर २०१७ रोजी झाली जेव्हा सौदी अरेबियाचे राजा सलमान ह्यांनी महिलांना पुरुषांप्रमाणेच देशात वाहन चालवण्याचा अधिकार देण्यास मान्यता दर्शविली. २४ जून २०१८ला जेव्हा महिलांच्या वाहन परवान्यांवरील बंदी उठवण्यात आली तेव्हा एका दिवसात तब्बल १,२०,००० महिलांनी नवीन वाहन परवान्यांसाठी अर्ज केले. तो दिवस सौदी अरेबियातील महिलांनी एखादा सण साजरा करावा तसा साजरा केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदीतील ह्या अतिशय महत्त्वाच्या कायदेशीर बदलाचे मुक्त हस्ताने स्वागत करण्यात आले.

भारतात महिलांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधान समितीने अनेक हक्क कायदेशीररित्या बहाल केले. त्यामुळे महिलांना हे हक्क मिळवण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली नाही. जे हक्क आपल्याला संविधानात सहज मिळाले आहेत त्याचे मूल्य आपल्याला तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत ते हक्क आपल्या कडून हिरावले जात नाहीत किंवा आपण कुणाला ह्या हक्कांशिवाय जगताना पाहत नाही. भारतात महिला वाहन चालकांची संख्या कमी असली तरी ती दिवसेंदिवस वाढत आहे. महिला ह्या पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या आणि जबाबदार पद्धतीने चारचाकी चालवून त्यांची मक्तेदारी मोडत आहेत. भारतात महिलांना चारचाकी चालवण्याचा कायदेशीर हक्क असला तरी त्यांच्या समोर मोठा सामाजिक लढा आहे. रस्त्यावरून जर एखादी महिला चारचाकी चालवत जात असेल तर हिला येणारच नाही, बघ किती विचित्र चालवते, बायकांनी गाड्या चालवूच नयेत अशा विविध टीका-टीपण्ण्यांना त्यांना सामोरे जावे लागते. सौदी अरेबियातल्या महिलांचीदेखील ही लढाई अजून संपलेली नाही. समाजाने महिलेला चूल आणि मूल ह्या पलीकडे जाऊन एक स्वतंत्र वाहन चालक म्हणून स्वीकारण्याचा लढा हा आत्ता कुठे सुरु झाला आहे. दोन्ही देश ह्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढतील आणि ह्या लढाईत पण नक्कीच जिंकतील!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *